जेएनएन, जळगाव: जळगाव जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल तीन लाख 38 हजार शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, मका, भात यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.

शेतकऱ्यांसाठी 345 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी 

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 345 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे केली होती. शासनाकडून ही मदत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

तहसील कार्यालयांतून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्याचे काम जोरात सुरू आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही प्रशासनाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी कार्यालयात कार्यरत होते.

काही ठिकाणी ही यादी तयार करण्याचे काम ‘ई-बिटी’ (e-BT) प्रणालीद्वारे केले जात असून, तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. तालुका प्रशासनाकडून तयार झालेल्या याद्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्यानंतर प्रत्यक्ष निधी वितरण सुरू होणार आहे.

शासनाने दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट निधी जमा केला जाणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीनुसार अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.