जेएनएन, जळगाव. Jalgaon Pushpak Express Incident: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इंथ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि खाली उड्या घेतलेल्या काही जणांना दुसऱ्या रुळावरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे

आम्ही घटनास्थळी आहोत. अतिरिक्त एसपी, एसपी, जिल्हाधिकारी आणि सर्वजण त्यांच्या मार्गावर आहेत. आम्ही डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. शेवटच्या उपलब्ध माहितीनुसार 8 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत, रेल्वे आणि रेल्वे रुग्णवाहिकांच्या अतिरिक्त बचाव व्हॅन घटनास्थळी पाठवल्या जात आहेत. अधिक माहितीची वाट पाहत आहे. शेवटच्या वृत्तानुसार, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. संख्या वाढू शकते. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

हेही वाचा - ग्रामंपचायत निवडणुकीचा बिगुल वाजणार, सरपंच पदांचे आरक्षण निश्चित, पाहा कोणती ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकभावना 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केल्या आहेत.

    8 रुग्णवाहिका रवाना

    माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

    हेही वाचा - प्रतीक्षा संपली! Truecaller मध्ये आले हे अत्यंत उपयुक्त फीचर, iPhone वापरकर्त्यांना मिळणार फायदा

     रेल्वेची अपघात मदत वैद्यकीय व्हॅन देखील भुसावळहून रवाना 

    मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील धनराज नीला यांनीही या घटनेबद्दल माहिती दिली आहे. पुष्पक एक्सप्रेस ही लखनौकडून मुंबईकडे येत असताना आग लागल्याची अफवा पसरली. काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. त्याच वेळी कर्नाटक एक्सप्रेस तेथून जात होती आणि विरुद्ध दिशेने जात होती, तेव्हा आम्हाला कळले की काही प्रवाशांना त्या ट्रेनने धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, 7-8 प्रवाशांना दुखापत झाली आहे. आम्ही त्यांची काळजी घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली आहे. आम्ही जवळच्या रुग्णालयांचीही मदत घेतली आहे. रेल्वेची अपघात मदत वैद्यकीय व्हॅन देखील भुसावळहून रवाना झाली आहे आणि ती लवकरच घटनास्थळी पोहोचेल. कर्नाटक एक्सप्रेसने आपला पुढचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे आणि जखमी प्रवाशांना मदत केल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस पुन्हा प्रवास सुरू करेल," असं मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील धनराज नीला यांनी सांगितलं.

    हेही वाचा - Jalgaon Trian Accident: रेल्वेला आग लागल्याची अफवा, अनेकांनी घेतल्या उड्या, 8 जणांचा मृत्यू

    हेल्पलाईन नंबर जाहीर

    लखनौमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे, प्रवाशांच्या सोयीसाठी लखनौ जंक्शनवर हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. नागरिक 8957409292 या क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकतात.