जेएनएन, नागपूर. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2025) हे नागपुरात होत आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनात मागाठाणे मतदारसंघातील झोपडपट्टीतील 50 घरे विकासकाशी संगनमत करून महापालिकेने तोडक कारवाई केली होती. यावरून शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत मंत्री उदय सामंत यांना चांगलाच टोला लगावला आहे.

उदय सामंत यांच्यावर मिश्किल टिप्पणी 

आमदार भास्करराव जाधव यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले त्यानंतर तालिका अध्यक्षांनी आमदार सुर्वे यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी आमचे मंत्री थातूरमातूर उत्तर देतात. एखाद्या मुद्दा दुसऱ्या दिशेने कसा न्यायचा हे त्यांना चांगले माहिती आहे. ते गुगली टाकण्यात मास्टर आहेत अशा शब्दात प्रकाश सुर्वे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर सुर्वे यांनी आक्षेप घेत अधिकाऱ्यांनी मंत्र्यांची दिशाभूल केली असेल असं म्हटलं.

आमदार प्रकाश सुर्वे सभागृहात काय म्हणाले…

लक्षवेधीवर संबंधित मंत्र्यांनी अत्यंत थातूरमातूर उत्तर दिले. ते हुशार मंत्री आहेत, कुठला मुद्दा कुठे न्यायचा हे त्यांना उत्कृष्टपणे कळते. गुगली टाकण्यात मास्टर आहेत. तरूण आहेत आणि आमच्या पक्षातील दुसऱ्या फळीतील ते नेते आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी चुकीची माहिती दिली आहे.

अधिकारी झोपले होते का?

    2012 ला या प्रकरणात कोर्टात खटला होता. 2012 ते 2024 म्हणजे इतके वर्ष अधिकारी झोपले होते का? गरीबांची घरे तोडण्याचा न्याय कुठला? 1967 पासून पुरावे असताना लोकांची घरे तोडण्यात आली. अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून घरे तोडली. 500 घरांना नोटीस दिली. खासगी बाऊन्सर घेऊन तोडक कारवाई करण्यात आली. हिंदू धर्माचं मंदिर तिथे बंद करण्यात आले. लोकांना घरातील सामानही काढून दिले नाही. मात्र तोडक कारवाई करताना काहीही बघितले नाही. विकासकावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

    मंत्री उदय सामंत यांचं संयमी उत्तर 

    सुर्वे यांच्या विषयाशी शासन 100 टक्के सहमत आहे. या जागेचे मालक इक्बाल खत्री यांच्याकडून 2020 साली मेसर्स शेलाजी इन्फास्ट्रक्चर यांना ती जागा ट्रान्सफर झाली होती. या प्रकरणी चौकशी केली जाईल. या घटनेबाबत समिती नेमून 60 दिवसांमध्ये याची चौकशी केली जाईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथली सर्व कार्यवाही स्थगित केली जाईल. आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेली माहिती अतिरिक्त मुख्य सचिवांकडे दिली जाईल. या चौकशीत जे कुणी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं मंत्र्यांनी सांगितले.