Nagpur Explosive Factory Blast : नागपूर जिल्ह्यातील एका सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारगाव जवळील फॅक्टरीत ही घटना घडली. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची सांगितले जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आहे. तर कंपनीच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला. रात्री अचानक झालेल्या जोरदार स्फोटाने आसपासच्या गावांना हादरे बसले आहे. लोकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली. काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व मदतकार्याला सुरुवात केली.
जखमी झालेल्या कामगारांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (GMCH) तसेच खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्यांला कुटुंबाकडे सुपूर्द केले आहे.
प्रशासनाची धावपळ!
स्फोटानंतर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव व मदत कार्य सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार रसायन हाताळणी दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनी ही देशातील मोठ्या औद्योगिक स्फोटक उत्पादकांपैकी एक मानली जाते. या कंपनीत यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तपास कार्य सुरू -
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने (DISH)ही चौकशी सुरू केली असून स्फोटाचे नेमके कारण व जबाबदार कोण याचा शोध घेतला जात आहे.