मुंबई/नागपूर. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या काही तास आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्याविरोधात अपक्ष लढल्याने आणि पक्षाचा पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा ठपका ठेवत बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीची रंगत वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नितेश कराळे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पक्षाकडून कराळेंवर ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव नितेश कराळे यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठींबा असल्याचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्याविरोधात निवडणूक लढवणं आणि शरद पवारांचा पाठिंबा असल्याचं संभ्रम निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.पक्षाच्या कारवाईनंतर कराळे मास्तर भावूक झाल्याचे व त्यांना रडू कोसळल्याचे पाहायलाा मिळाले.
पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्री. नितेश कराळे (गुरुजी) यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणे, तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करून पक्षशिस्त आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन केल्याने, माननीय प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार श्री. नितेश कराळे (गुरुजी) यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे.
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 22, 2026
कारवाईनंतर कराळे मास्तरांचा थेट इशारा -
यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पक्षासाठी अनेक वर्षे काम केले असून अनेक आंदोलने केली आहेत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढलो, तरीही पक्षाने आपली दखल घेतली नाही. आंदोलनांसाठी माझ्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले. शेतकरी आंदोलनावेळी 20 गुन्हे दाखल झाले, मी तुरुंगीत गेलो. सहा-सात दिवस आत मध्ये होतो, तेव्हा एका नेत्याचा फोन आला नाही, अशी खंत नितेश कराळे यांनी व्यक्त केली. तर शासनाने हा सुद्धा मला दिलेला पुरस्कार आहे. पक्षाने माझ्यावर केलेल्या कारवाईचे उत्तर मी स्पष्टीकरणासह देईन आणि ज्यांनी माझा गेम केला, त्यांना उघड करीन', असा इशारा देखील नितेश कराळे यांनी यावेळी दिलाय.
या निवडणुकीत माझा मोठ्या मतांनी विजय होईल. जनतेनं मला मोठा पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असून आपण त्यात विजयी होणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय.
