मुंबई. Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील पाच जागांसाठी एकूण 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांसह पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीमधील बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी आणि महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढती यांमुळे राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत.
पाचही मतदारसंघांतील मतदानासाठी प्रशासनाने तयारी केली असून, राज्यभरात 2 हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 10 लाख 68 हजार 72 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मतदानानंतर कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला मतदारांचा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात यंदा 38 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यातील लढतीकडे विशेष लक्ष आहे. वंचित बहुजन आघाडीचे मंगेश वानखेडे आणि शिक्षक भारतीचे अतुल देशमुख हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने मतविभाजनाची शक्यता चर्चेत आहे.
नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत मतदान होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या मतदारसंघात 2 लाख 55 हजारांहून अधिक मतदार असून, 445 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 44 हजार 466 मतदार आहेत. चंद्रपूरमध्ये 32 हजार 265, गोंदियामध्ये 22 हजार 176, वर्ध्यात 21 हजार 742, भंडाऱ्यात 21 हजार 349 आणि गडचिरोलीत 13 हजार 608 मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील थेट लढतीसोबतच अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे पदवीधर मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार मैदानात
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात 3 लाख 88 हजार 19 मतदार असून, पाच जिल्ह्यांमध्ये 741 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यात 160 मतदान केंद्रांवर 88 हजार 202 मतदार मतदान करतील. साताऱ्यात 93 केंद्रांवर 47 हजार 463, सोलापूरमध्ये 117 केंद्रांवर 49 हजार 72, सांगलीत 159 केंद्रांवर 88 हजार 70 आणि कोल्हापूरमध्ये 212 केंद्रांवर 1 लाख 14 हजार 562 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. विविध पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यातील स्पर्धेमुळे मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, याबाबत उत्सुकता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवारांमध्ये लढत
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठीही आज मतदान होत आहे. या मतदारसंघात एकूण 61 हजार 940 मतदार असून, ३१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.
पुणे जिल्ह्यात 72 मतदान केंद्रांवर 16 हजार 822 मतदार, सोलापूरमध्ये 76 केंद्रांवर 15 हजार 303, साताऱ्यात 44 केंद्रांवर 9 हजार 454, सांगलीत 48 केंद्रांवर 8 हजार 62 आणि कोल्हापूरमध्ये 70 केंद्रांवर 12 हजार 299 मतदार मतदान करणार आहे.
या मतदारसंघात ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेनेचे सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यासह अन्य उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि शिक्षक संघटनांमधील प्रभाव हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात आठ जिल्ह्यांत मतदान
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील आठ जिल्ह्यांत मतदान होत आहे. या मतदारसंघातही विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत असून, पदवीधर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे लक्ष लागले आहे. स्थानिक राजकीय समीकरणे, उमेदवारांची संघटनात्मक ताकद आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न निकालावर प्रभाव टाकणार आहे.
या मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासनाने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मतदान केंद्रांवर कर्मचारी, मतदान साहित्य आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांत मतदान
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. शिक्षक मतदारांच्या प्रश्नांवर आणि संघटनात्मक पाठबळावर उमेदवारांचे यश अवलंबून राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातही विविध उमेदवारांमध्ये चुरस असून, मतदानाचा टक्का आणि मतदारांचा कल याकडे राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
बंडखोरी, नाराजी आणि मैत्रीपूर्ण लढतींची परीक्षा
या निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजीचे आव्हान आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात काही ठिकाणी उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याने मतविभाजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होत असल्याने आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांचीही कसोटी लागणार आहे.
