जेएनएन, नागपूर: औरंगजेब कबरीचा वाद थेट नागपूरमध्ये पोहचला आहे. नागपूरच्या महाल भागात दोन गटात तुफान दगडफेकची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी गाड्यांचे जाळपोळ सुद्धा करण्यात आले आहे. पोलीसवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे. पोलीसकडून अश्रू धुरांच्या नरकांडया सोडण्यात आले आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर मध्ये अजूनही तणाव असून जमावबंदी लागू केली आहे. नागपूर वासियांना शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री यांनी केले आवाहन
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे ही फडणवीसांनी म्हटले आहे.

नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

हेही वाचा:Aurangzeb Tomb Controversy: औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये मग कबर खुलताबादेत का? काय होती त्याची शेवटची इच्छा

देवेंद्र फडणवीसांचा इशारा
नागपूरमधील महाल परिसरामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे ती घटना निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली. अगदी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. हे फारच चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मी पोलीस आयुक्तांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व कठोर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. जर कोणी पोलिसांवर दगडफेक करत असेल किंवा समाजामध्ये तणाव निर्माण करत असेल तर अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूरमध्ये शांतता राखण्याचे मी आवाहन करतो. तसेच नागपूरची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणी जाणूनबुजून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

हेही वाचा:Nagpur violence: औरंगजेबावरून वाद… नागपुरात हिंसाचार, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक; अनेक वाहने जाळली

विरोधी पक्षाचा आरोप
नागपूर सारख्या शांत शहरात जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे.गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे, त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे.या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती असा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे, यासाठी जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.नागरिकांना आवाहन करत आहे की शांतता बाळगावी.