जेएनएन, नागपूर. Nagpur News: नागपूरकरांना आज आकाशात वेगळाच नजारा पाहायला मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून नागपुरात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे नागपुरात गर्मी कमी झाली आहे. त्यामुळे नागपूरकर आज दुपारी भर उन्हात आपल्या घरातून बाहेर निघाले होते. यावेळी त्यांना आकाशात एक वेगळाच नयनरम्य आणि आकर्षक असा नजारा पाहायला मिळाला आहे.
नागपूरकरांना दिसले सूर्याभोवती वलय
नागपुरात आज म्हणजेच 21 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानकपणे सुर्याभोवती एक मोठे इंद्रधनुष्यांचे रिंगण आले होते. हे अनोखे आणि अपरिचित असं इंद्रधनुष्याचं रिंगण पाहुन नागपूरकर अवाक झाले आणि पाहाता पाहाता संपूर्ण शहरात ही वार्ता परसली. यानंतर नागपुरकरांनी मोठ्या प्रमाणात या अद्भूत, अविस्मणीय क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ काढून इतरांना पाठवण्यास आणि ही गोष्ट काय आहे. याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेकांनी यामागील वैज्ञानिक कारण शोधण्यासाठी गुगलचा वापर केला. आज दुपारी सूर्याभोवती आलेले वलय नागपूरकरांसाठी चर्चेचे कारण ठरला होते.
सूर्याभोवती वलय किंवा रिंगण का आले?
वैज्ञानिक भाषेत सूर्याभोवती वलय किंवा रिंगण येण्याच्या या दृश्याला ‘सोलर हेलो’ किंवा 22 अंशीय वलय असं म्हटले जाते. सोलर हेलो म्हणजे सूर्याभोवती निर्माण होणारे वर्तुळाकार प्रकाशवलय. यामध्ये इंद्रधनुष्याचे रंग दिसतात, विशेषतः लालसर आतील बाजूला आणि बाहेरील बाजूला निळसर रंग असतो. हे वलय 22 अंश कोनात दिसते, म्हणून याला ‘22 डिग्री हेलो’ असेही म्हणतात.
सोलर हॅलो दिसणे हे अनेकदा हवामानात बदल होणार असल्याचे संकेत देते, कारण सिरोस्ट्रेटस ढग हे कमी दाबाच्या प्रणालींपूर्वी अनेकदा दिसतात. वैज्ञानिक महत्त्वाव्यतिरिक्त, सोलर हॅलो ही एक सुंदर आणि विस्मयकारक नैसर्गिक घटना आहे, जी लोकांना आकर्षित करते.
सोलर हेलो ही एक प्रकाशीय घटना आहे. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील अतिदुर्लभ व उंचावर असणाऱ्या सिरस ढगांमधील बर्फकणांवरून अपवर्तित होतो, तेव्हा हा वलय तयार होतो. सिरस नावाचे ढग हे 5 ते 10 किलोमीटर उंचीवर असतात आणि बारीक बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात. सूर्यकिरणे जेव्हा या स्फटिकांमधून जातात, तेव्हा त्यांचा अपवर्तन होतो व त्या एका विशिष्ट कोनात (22 अंश) वळतात. परिणामी, आकाशात सूर्याभोवती एक सुंदर, वर्तुळाकार वलय दिसते.
सोलर हेलो ही काही वेळा हवामानातील बदलाचा सूचक मानली जाते. हे वलय हवामानातील बदल, आर्द्रता वाढणे किंवा पर्जन्याची शक्यता दर्शवते. त्यामुळे या घटनेनंतर पाऊस किंवा वादळ येण्याची शक्यता असते, मात्र हे प्रत्येकवेळी बरोबर ठरतेच असे नाही.