जेएनएन, नागपूर: नागपूर महापालिका निवडणुकांच्या (Nagpur Mahanagarpalica Election) पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी सलग बैठकांचा धडाका सुरू असून, संघटनात्मक मजबुती, जागावाटप, संभाव्य उमेदवार आणि प्रचारयंत्रणेच्या नियोजनावर सखोल चर्चा होत आहे. शहरातील राजकीय हालचालींना त्यामुळे वेग आला आहे.
स्थानिक प्रश्नांवर आधारित अजेंडा ठरववा - नितीन गडकरी
या बैठकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भर दिला आहे. महायुती एकजुटीने निवडणुकांना सामोरे गेली पाहिजे, स्थानिक प्रश्नांवर आधारित अजेंडा ठरवला पाहिजे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवला पाहिजे, असा स्पष्ट संदेश गडकरी यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
सामाजिक घटकांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर
भाजपच्या बैठकीत नागपूर शहरातील प्रभागरचना, मागील निवडणुकांतील कामगिरी, सध्याचे राजकीय समीकरण आणि विरोधकांची ताकद याचा आढावा घेतला जात आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत आणि अनुभवी नगरसेवकांवर विश्वास ठेवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. महिला, युवा आणि सामाजिक घटकांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे.
या मुद्दांना प्रचारात अग्रक्रम देण्याची रणनीती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकांमध्ये पक्षाची शिस्त, प्रचारातील सकारात्मकता आणि विकासकेंद्रित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर शहरात सुरू असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या विषयांना प्रचारात अग्रक्रम देण्याची रणनीती आखली जात आहे.
दरम्यान, महायुतीतील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवर संवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संभाव्य मतभेद टाळून एकत्रित लढत देण्याचा सूर बैठकीतून उमटत आहे. येत्या काही दिवसांत प्रभागनिहाय आढावे आणि कार्यकर्ता मेळावे घेण्यात येणार असल्याचेही संकेत आहेत.
नागपूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला असून, रामगिरीवरील बैठकांमुळे राजकीय हालचाली अधिकच वाढले आहे.
