अमरावती (एजन्सी) - महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची 2 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरल्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. नागपुरातून चोरीस गेलेली बस पोलिसांनी अमरावतीतून जप्त केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून सुमारे 20 बस चोरी केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

बुधवारी रात्री नागपूरच्या इमामवाडा स्टँडवरून 'शिवशाही' ई-बस चार्जिंगला लावली असताना चोरीला गेली, अशी माहिती राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली. याप्रकरणी नागपूरमधील गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि ही माहिती इतर पोलीस युनिट्सनाही कळवण्यात आली.

चोरीनंतर चौकशी सुरू करण्यात आली आणि एका पथकाला राजापेठ स्टँडपासून थोड्या अंतरावर बस सापडली. थोड्याच वेळात एक माणूस बसमध्ये चढताना दिसला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. "त्या व्यक्तीने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये तब्बल 20 बस चोरल्याची कबुली दिली आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.

त्याच्यावर 2023-24 मध्ये तिरुमला गुन्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि 2026 मध्ये नांदेडमधील वझीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस चोरल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपी आंतरराज्यीय बस चोर- पोलिसांनी सांगितले की, अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणांहून वाहने चोरीला गेली आहेत का, हे पाहिले जात आहे. राज्यभरात आणि देशभरात बिनतारी संदेश प्रसारित केले जात आहेत. चोर वाहनातून सुटे भाग काढून त्याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.  ई-बस चोरण्यामागे त्याचा उद्देश बॅटरी मिळवणे हा आहे, ज्यांची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.