ठाणे- ठाणे जिल्ह्यातील मीरा-भायंदर शहरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नारळाचे झाड अंगावर पडून एका माजी उपमहापौरांच्या 35 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

बुधवारी घडलेल्या घटनेनंतर दोन दिवसांनी, मुर्दगावचे रहिवासी आणि मीरा-भयंदर महानगरपालिकेच्या (एमबीएमसी) माजी उपमहापौरांचे पुत्र, पीडित राहुल अशोक पाटील यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.

पावसामुळे मुंबईसह उपनगरे व ठाणे पालघरमध्ये हाहाकार माजला आहे. रस्त्यांवर पाणी जमा झाल्याने व रस्त्यांवरील खड्डे दिसत नसल्याने वाहनधारक त्यात पडत आहेत. मुंबईजवळच्या मीरा-भायंदर परिसरातही एक दुर्घटना समोर आली आहे. मीरा-भायंदरमधील मर्दगावचे 35 वर्षीय मोटारसायकलस्वार राहुल अशोक पाटील यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पाटील सदानंद नगर परिसरातून आपल्या मोटारसायकलने जात असताना, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले नारळाचे झाड त्यांच्या वाहनावर कोसळले.

पाटील यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले, असे सांगण्यात आले.

या पावसाळ्यात ठाणे शहरातील पावसामुळे झालेली ही पहिली जीवितहानी नोंदवली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.