जेएनएन, नागपूर: अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू आणि शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून निधी आणा

मुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, शेतकऱ्यांसाठी तिथून निधी आणा. त्यानंतरच महाराष्ट्राला कळेल की तुमची दिल्लीत किती किंमत आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत आणि केवळ घोषणा करून उपयोग नाही, तातडीने भरीव मदत हवी आहे.” असं वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री जर खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी असतील तर… 

 “राज्यात पूरस्थिती भयावह आहे. हजारो कोटींचं नुकसान झाले आहे. तरी केंद्र सरकारकडून अजून ठोस मदत जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांसाठी NDRF आणि इतर योजनेतून त्वरित पॅकेज जाहीर करावे. मुख्यमंत्री जर खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी असतील, तर ते निधी आणून दाखवतील,” असेही वडेट्टीवार म्हणाले.

    ठाकरेंचाही सरकारला इशारा

    शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. अशा वेळी सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने मदत जाहीर करावी. पीएम केअर फंडातून थेट शेतकऱ्यांना मदत द्यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. कर्जमुक्ती न केल्यास जनतेचा रोष अनावर होईल आणि आम्हीही शेतकऱ्यांच्या लढ्यात रस्त्यावर उतरणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनीही सरकारला दिला आहे.