नागपूर - Nagpur graduates constituency Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आघाडी घेऊनही भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजय मिळवता आला नाही. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत जोरदार मुसंडी मारत अखेर विजय मिळवला. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये दिसणारे चित्र दुसऱ्या पसंतीच्या मतांनंतर पूर्णपणे बदलू शकते, हे या निवडणुकीत पुन्हा स्पष्ट झाले.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत सुधाकर कोहळे यांना 60 हजार 924 मते, तर अभिजित वंजारी यांना 56 हजार 630 मते मिळाली होती. त्यामुळे कोहळे यांनी वंजारी यांच्यावर 4 हजार 294  मतांची आघाडी घेतली होती. दुसरीकडे, अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना 24 हजार 249 मते मिळाली होती. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांची मोजणी कोणाच्या बाजूने निकाल फिरवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

पहिल्या पसंतीत कोहळेंची आघाडी

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोहळे आणि वंजारी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या टप्प्यात वंजारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोहळे यांनी मोठी आघाडी मिळवली. दोन्ही टप्प्यांतील मतांची बेरीज झाल्यानंतर कोहळे यांना 60 हजार 924, तर वंजारी यांना 56 हजार 630 मते मिळाली.

यामुळे भाजपच्या गोटात विजयाबाबत अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते मिळवणे एवढेच विजयासाठी पुरेसे नव्हते. कोणत्याही उमेदवाराला आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नसल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी करणे आवश्यक ठरले.

नितेश कराळे यांची मते ठरली महत्त्वाची

    या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेली 24 हजार 249 मते चर्चेचा विषय ठरली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोहळे यांची आघाडी असली, तरी कराळे यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते निकालाचे समीकरण बदलू शकत होती.

    नियमानुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांना मतमोजणीच्या प्रक्रियेतून बाद करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते पात्र उमेदवारांच्या खात्यात जमा केली जाऊ लागली. या प्रक्रियेत कराळे यांच्यासह इतर उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांकडे विशेष लक्ष लागले होते. दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे वंजारी यांनी कोहळे यांची आघाडी कमी करत अखेर विजय मिळवला.