मुंबई/नागपूर - maharashtra vidhan parishad result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघात चक्रावणारा निकाला लागला आहे. काँग्रेसने या जागेवर आपला झेंडा फडकावला आहे. विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पराभवाचा धक्का दिला. रात्री उशिरापर्यंत मतमाेजणी सुरू हाेती. त्यानंतर वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. नागपूरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, मतांचे बदलते गणित, पक्षांतर्गत नाराजी आणि अपक्ष नितेश कराळे मास्तर यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची वंजारी यांना मिळालेली साथ यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला.

महाविकास आघाडीने 3-2 ने विधानपरिषदेचे रण जिंकले -

तब्बल 45 तास चाललेल्या मतमोजणीनंतर विधान परिषदेच्या 5 जागांचं चित्र स्पष्ट झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी, तर अमरावती शिक्षक निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सरनाईकांनी विजय मिळवला. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील यांनी विजय मिळवला आहे. म्हणजेच विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागेवर महाविकास आघाडी आणि 2 जागेवर महायुतीने विजय मिळवला. 

नागपुरात काँग्रेसची बाजी -

नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर ( Nagpur graduates constituency Result 2026) मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजित वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

छत्रपती संभाजीनगरात सतीश चव्हाणांना धक्का

    औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात (Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026) अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली. विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्या सलग तीन टर्म म्हणजेच मागील 18 वर्षांपासूनच्या मतदारसंघावरील वर्चस्वाला धक्का बसला आहे. दुसर्‍या पसंतीची 39 पैकी 23 उमेदवारांची मते मोजल्यानंतर चव्हाण यांना 60,935 मते तर प्रतापसिंह पाटील यांना 74,142 मते होती. 13,207 मतांची आघाडी घेत पाटील यांनी विजय मिळवला.

    पुणे शिक्षक मतदार संघामधून भाजपचे कौस्तुभ गावडेंचा विजय- 

    पुणे शिक्षक मतदार संघामधून (Pune Teachers Constituency Result 2026) 

    भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सचिन सानप यांचा कौस्तुभ गावडेंनी पराभव केला. तसेच विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. कौस्तुभ गावडे सुमारे 6 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. कौस्तुभ गावडे यांना 23117 मते मिळाली तर शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप यांना 16347 मते मिळाली.

    पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय, भाजपला धक्का- 

    पुणे पदवीधर मतदाररसंघाच्या निवडणुकीत (Pune Graduates Constituency Result 2026) भाजपाला मोठा धक्का बसला. भाजपाच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला. तर या जागेवर हर्षदा जाधव देशमुख यांचा तब्बल 9 हजार 700 मतांनी विजय झाला. मतमोजणीच्या सुरुवातीपासून स्मिता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात अटीतटीचा सामना होता. मात्र नंतर हर्षदा जाधव यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. या निवडणुकीत हर्षदा जाधव यांना 1 लाख 13 हजार 840 मतं मिळाली. तर स्मिता जाधव यांना 1, 03, 912  मते मिळाली.

    अमरावतीत शिंदेसेनेचे सरनाईक विजयी, पोहरेंचा पराभव

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात (Amravati Teachers Constituency Result 2026) महायुतीमध्ये शिंदेसेनेचे किरण सरनाईक दुसऱ्या पसंतीक्रमाच्या अखेरच्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक 16,134 मतांचा कोटा पार करीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रा. अदिती पोहरे यांचा पराभव केला व मतदारसंघ पुन्हा राखला. पहिल्या पसंतीच्या फेरीपासून सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. मात्र, विजय साकार करण्यास त्यांना 24 व्या बाद फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला. तब्बल 32 तास सुरू असलेल्या या मतमोजणीमध्ये त्यांनी 16,663 मते मिळवित विजय मिळवला. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 8636 मते मिळाली.