नागपूर. Maharashtra Municipal Election 2026 Voting : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026)आज सकाळपासून मतदान होत आहे. दरम्यान सकाळपासूनच मतदान यंत्रातील बिघाड, दुबार मतदार तसेच बोटावर शाई ऐवजी मार्करचा वापर या मुद्द्यावरून जोरदार राडा सुरू आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानात मार्करने शाई लावण्याच्या प्रकारावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनी या वादावर भाष्य केले आहे.

मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. यामुळे खळबळ माजली असतानाच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, जे विधानसभेला केले ते आता केले जात आहे, मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. आजपर्यंत बोटांना शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण केली जात आहे, हे सॅनिटाईजरने सहज पुसले जात आहे. असा फ्रॉड करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. याला निवडणुका म्हणत नाहीत. राज ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांनी आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांना बोटांवर शाईऐवजी मार्करने खूण केली जात असल्याबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, अशा सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्कर पेन वापरण्यात आले आहेत. याला जर कोणाचा आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष द्यावे.  मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र स्वायत्त संस्थांवर असा संशय घेऊ नये. 

फडणवीस म्हणाले की, मात्र, मला असं वाटतंय काही लोकांना उद्याचा निकाल समजला आहे, तेव्हा निकालानंतर कोणाला दोष द्यायचा याची ते तयारी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

    बोटाची शाई व पाडूवरून घमासाण -

    दरम्यान मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. मात्र ते अन्य २८ महापालिकांमध्ये न वापरता केवळ मुंबईत वापरले जाणार असल्याने खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.