मुंबई. BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना दादर परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराजवळील कोहिनूर स्क्वेअर येथील मतदान केंद्रावर एका महिला मतदाराचे नाव दुबार नोंद असल्याचे आढळून आले.
वार्ड क्रमांक 192 चे उमेदवार यशवंत किल्लेदार सकाळच्या सत्रात मतदानासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मतदार यादी तपासली असता संबंधित महिलेचे नाव दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंद असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित महिला मतदाराला थांबवले. तिचे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांची पडताळणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीनंतर हा तांत्रिक चूक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, अशा परिस्थितीत मतदाराकडून डिक्लरेशन (प्रतिज्ञापत्र) भरून घेण्यात येते. त्यानुसार संबंधित महिलेकडून लेखी प्रतिज्ञापत्र घेण्यात आले असून, त्यानंतरच तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
या घटनेनंतर मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवली.
दरम्यान, या प्रकारामुळे मतदार यादीतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा चुका टाळण्यासाठी अधिक काटेकोर तपासणीची गरज व्यक्त केली जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
