जेएनएन,नागपूर. International Yoga Day 2025: नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते, अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे 'करा हो नियमित योगासन' हे गीत म्हणत शनिवार (ता. २१) सकाळी हजारो योगसाधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडीयमवर शनिवारी पार पडला. 

यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व  इतर कर्मचारी शहरातील विविध योगाभ्यासी मंडळचे स्वयंसेवक व हजारोंच्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागपूर शहर नशा मुक्त करण्याकरिता नागपूर पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन थंडर’ अंतर्गत उपस्थितांना नशा मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीमती अनामिका मिर्जापुरे यांनी प्रतिज्ञा देवोवली.

चित्तथरारक प्रात्यक्षिके
जागतिक योग दिननिमित्त घेण्यात आलेल्या सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात नागपूर जिल्हा योग असोशिएशनचे अनिल मोहगावकर व संदीप खरे यांच्या चमूने योगाचे विविध मानवीय मनोरे व कठीण योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे सादरीकरण करणाऱ्या संघात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. 

योगमय वातावरण
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकावर पुष्पवर्षाव करण्यात आला. एका रांगेत शिस्तबद्ध रीतेने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले.

विविध मंडळांचा सहभाग
जागतिक योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, आरपीएफ, सीआरपीएफ, एनएचएआई,आदींनी सहभाग नोंदविला.  योग दिनाच्या निमित्ताने स्टेडियममध्ये एकत्रित होणाऱ्या साधकांना धवल वस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येत धवल वस्त्र परिधान करून आलेल्या साधकांमुळे स्टेडियम पांढऱ्या रंगाने व्यापले होते.

हेही वाचा:International Yoga Day 2025: मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसह साजरा केला योग दिन; पुणे विद्यापीठात ‘भक्तियोग’ कार्यक्रम उत्साहात