जेएनएन, पुणे. International Yoga Day 2025: आज संपूर्ण जगभरात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित 'भक्तियोग' कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता, कारण संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.

या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आज संपूर्ण जगभर योग दिन साजरा केला जात आहे. पुण्यात विशेषतः वारकऱ्यांच्या सोबत 'भक्तियोग' या नावाने एक अनोखा आणि अध्यात्मिक कार्यक्रम पार पडला. योग आणि भक्ती यांचा संगम या कार्यक्रमातून झाला. राज्यातील ७०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी योग सत्र घेण्यात आले. पालख्या पुण्यात मुक्कामी असल्याने हे आयोजन आणखी महत्त्वपूर्ण ठरले."

कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे आणि विद्यापीठाचे पदाधिकारी तसेच अनेक वारकरी उपस्थित होते. अनेक दिंड्यांमधील वारकऱ्यांनीही या योग कार्यक्रमात सहभाग घेतला.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे योग दिन साजरा केला. योग सत्रानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, "आपले संपूर्ण जीवन अतिशय गतिमान झाले आहे. अशा वेळी योग हे आपल्या प्राचीन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. योग हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, दररोजच्या जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेला अनुसरून आपण योगद्वारे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवू शकतो. सर्व आयोजकांचे आणि योग संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो."

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये, सरकारी व खासगी संस्थांमध्ये योगाचे सामूहिक सत्र, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.

हेही वाचा:14,000 फुटांपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत, संपूर्ण देश झाला योगमय; विशाखापट्टणमहून पंतप्रधानांचा खास संदेश