जेएनएन,नागपूर: नागपूर महानगरपालिके अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे विविध प्रकल्पांसंदर्भात कार्य सुरु आहेत. या सर्व कार्यांमध्ये येणारे अडथळे दूर करून कार्याला गती द्या,  तसेच येत्या गणेशोत्सवात गणेश मंडळानी सामाजिक बांधिलकी जपत मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी दिले.

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता. २०) मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेडच्या सभाकक्षामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या कार्यकारी समितीची सभा पार पडली. बैठकीमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मनुष्य संसाधन धोरण (एचआर पॉलिसी) बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियानानाच्या अंतर्गत कार्यरत रजा, बदली यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी महत्वपूर्ण सूचना नोंदविल्या. केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगातून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत अनेक बांधकाम कार्य सुरु आहेत. या सर्व बांधकामाच्या कार्याला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त आयुक्तांनी राष्ट्रीय व राज्य  स्तरावरील गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) तसेच आशा सेविकांचे प्रशिक्षण व रिक्त पदांबाबत देखील आढावा घेतला.

किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती यांनी सदर केली. ब्रिडिंग चेकर्सचे कार्य, आरआरटी चमू आणि मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (एमएसयू)ची निगराणी यामुळे यावर्षी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्याची विभागाची योजना असल्याचे यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी अतिरिक्त आयुक्तांना सांगितले. झोनस्तरावर गणेश मंडळांशी संपर्क साधून त्यांना रक्तदान शिबिरांबाबत जागरूक करण्याची सूचना श्रीमती वसुमना पंत यांनी केली.

हेही वाचा:Delhi Ganeshotsav : मुंबई नव्हे बाप्पांच्या स्वागताला दिल्लीही सजली.. रंगारंग कार्यक्रम व आकर्षक देखावे, पटापट नोट करा लोकेशन्स