जेएनएन, नागपूर: ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार सुप्रिया अय्यर  (Supriya Iyer) यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट येथे उपचार सुरू होते. वयाच्या 74 वर्षी काल रात्री आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे कथासंग्रह प्रसिद्ध

सुप्रिया अय्यर यांचे खुळी बोगनवेल, सोन्याचे दरवाजे आणि किनखापी मोर हे कथासंग्रह, सनान रे बोंद्र्या हा वऱ्हाडी कथासंग्रह, चांदणचुरा व काही शुभ्र कमळे हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध होते. त्यांच्या खुळी बोगनवेल, किनखापी मोर या कथासंग्रहांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार मिळाले होते. तसंच, त्यांना अन्य संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली 

ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांच्या निधनाने अनेक महिला लेखिका घडविणार्‍या एका ज्येष्ठ साहित्यिकेला आपण मुकलो आहोत, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

    अनेक महिलांना लिहिते केले

    मराठी साहित्यात स्त्रीलेखनात स्वत:ची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. केवळ लेखिका नाही तर अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना लिहिते केले. साहित्य क्षेत्रातील अनेक आयोजनांत त्यांचा पुढाकार असायचा. याच अभिव्यक्तीच्या माध्यमातून साहित्य संमेलने त्या घ्यायच्या. स्वत: प्रतिथयश झाल्यावर नवी पिढी निर्माण करणे, हे काम फार कमी लोकांना जमते, ते त्यांनी केले. साहित्यसेवेसोबतच समाजसेवेतही संस्थात्मक कार्य करुन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. वैद्यकीय क्षेत्र असेल, एड्सपीडितांसाठी केलेले काम असेल, त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ती सदैव जिवंत असायची. असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.