नागपूर - महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका,पतसंस्था आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाणे, त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे काढणे आणि त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू आहे. मंत्र्यांचे आदेश धाब्यावर टाकून मनमानी कारभार सुरू असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील शेतकरी दुष्काळ, पीक नुकसानी आणि आर्थिक संकटामुळे हवालदिल झाला आहे. सहकारमंत्री यांनी कर्जाचे पुनर्गठन केले असून शेतकऱ्यांकडून वसुली करू नये, असे निर्देश दिले. मात्र, प्रत्यक्षात वसुली सुरूच असेल तर सरकारच्या आदेशांना किंमत आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. जे कोणी वसुली करायला येईल ,फोटो काढण्याची जबरदस्ती करेल त्यांना बदडून काढा, विरोध करा अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
शेतकरी जगला काय, मेला काय, सरकारला त्याची चिंता नाही का? असा संतप्त सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की, कर्नाटकमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली, मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचे चित्र दिसत नाही. राज्य सरकारची पावले शेतकऱ्यांना दिलासा देणारी नाहीत. सरकारने तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा.
राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे. साखरेचे दर वाढून किलोमागे 55 रुपयांपर्यंत पोहोचत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य भाव का मिळत नाही? उसाला प्रतिटन 5,000 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिष्टमंडळाने पाठपुरावा केला,मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करणे अन्यायकारक आहे.
शेतकऱ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे प्रश्नही गंभीर आहेत. परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा करून सरकारने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविद्यालयांची फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पैसे नाहीत आणि महाविद्यालयांकडून शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्याऐवजी केवळ परीक्षा शुल्क माफ करून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही.
दुसरीकडे, देशातील तरुणांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले, तिरंगा हातात घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला, तर त्यांना तुरुंगात टाकले जाते. आंदोलन हिंसक आहे का, आंदोलनात दहशतवादी किंवा नक्षलवादी आहेत का, असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सरकारच्या धोरणांवर बोट ठेवणे आणि चुका दुरुस्त करण्याची मागणी करणे हा लोकशाहीतील नागरिकांचा अधिकार आहे. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना शिक्षा देऊन प्रश्न सुटणार नाहीत. देशातील सर्व तरुण रस्त्यावर उतरले तर त्यांना ठेवण्यासाठी तुरुंगही कमी पडतील, असा इशारा त्यांनी दिला.
