एजन्सी, भंडारा. Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील एका ड्राय क्लीनिंग दुकानातून बँकेचे 5 कोटी रुपये जप्त झाल्यानंतर पोलिसांनी एका खाजगी बँकेच्या व्यवस्थापकासह 9 जणांना ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
6 कोटी रुपये परत देण्याचे आश्वासन
काही लोकांनी अॅक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला 6 कोटी रुपये परत देण्याचे आश्वासन देऊन 5 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले होते, असे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला सांगितले.
ड्राय क्लीनिंग दुकानावर छापा
गुप्त माहितीवरून कारवाई करताना, गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने मंगळवारी तुमसर परिसरातील इंदिरा नगर येथील ड्राय क्लीनिंग दुकानावर छापा टाकला.
दोन तास लागले पैसे मोजायला
यावेळी दुकानातील एका बॉक्समध्ये ठेवलेले 5 कोटी रुपये पोलिसांनी जप्त (Bhandara Rs 5 cr Seized) केले, असे त्यांनी सांगितले. पोलिसांना मशीनच्या मदतीने रोख मोजण्यासाठी सुमारे दोन तास लागले.
"व्यवस्थापकाने बँकेतून पैसे काढले असे दिसून आले आहे. आम्ही अॅक्सिस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे आणि ते तुमसरला आल्यानंतर अधिक माहिती मिळेल," असे हसन यांनी सांगितले आहे.
नऊ जणांना घेतले ताब्यात
बँक व्यवस्थापक आणि इतर आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.