जेएनएन, नागपूर. राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला नागपूरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्ग आणि हैद्राबाद महामार्गावर चक्काजाम केला आहे. त्याचवेळी अनेक शेतकरी रेल्वे ट्रॅकवर उतरल्याने रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी! 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, वीजबिल माफी, आणि पीकविमा रकमेच्या थकबाकीबाबत मागणी करत राज्यभर शेतकरी आंदोलने सुरू आहेत. नागपूर हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले असून, आज सकाळपासून हजारो शेतकरी शहराकडे निघाले. “कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही”, “शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. 

महामार्ग आणि रेल्वेमार्गावर शेतकरी उतरले

आंदोलनकर्त्यांनी सकाळीच हैद्राबाद महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर बसून चक्काजाम आंदोलन सुरू केले. नागपूरहून भंडारा, वर्धा आणि अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांची लांबलचक रांग लागली. काही शेतकरी गटांनी नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात आणि खापरखेडा भागात रेल्वे ट्रॅकवर उतरून निदर्शने केली.

त्यामुळे नागपूर–गोंदिया, नागपूर–चंद्रपूर या मार्गावरील काही गाड्या थांबवाव्या लागल्या. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. 

    बच्चू कडूंची भूमिका!

    आंदोलनस्थळी उपस्थित राहून बच्चू कडू म्हणाले, सरकारने वारंवार आश्वासने दिली पण काहीच पाळले नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सत्ताधारी मौन बाळगत आहेत. आता शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, तो न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. तसंच, कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर हा आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी दिला.