जेएनएन, नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातून आलेले शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागपूर-हैदराबाद महामार्गासह समृद्धी महामार्गाच्या मार्गावर आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
या आंदोलनाचं स्वरूप काही काळानंतर तीव्र झालं आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात केली. आंदोलनकर्त्यांनी “शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, (farmer loan waiver) अन्यथा रस्त्यावर उतरू” अशी घोषणा देत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
भाजप आमदार आंदोलनात अडकले
दरम्यान, या आंदोलनात वर्धा जिल्ह्याचे देवरी मतदारसंघाचे भाजप आमदार राजू बकाने त्यांच्या वाहनासह महामार्गावर अडकले. आंदोलनामुळे मार्ग बंद असल्याने त्यांना पुढे जाता येत नव्हते. परिस्थिती चिघळू नये म्हणून आमदार बकाने यांनी अखेर आपलं वाहन तिथेच सोडलं आणि सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यातून आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना पाहिलं असलं तरी मोठा अनुशासनभंग न घडता आमदार बकाने सुरक्षित ठिकाणी पोहोचले. या घटनेनंतर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
तोपर्यंत रस्त्यावर राहू
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सांगितले की,“शेतकरी आजही कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत. सरकारने कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं, पण प्रत्यक्षात काहीही झालं नाही. आम्ही शांत बसणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर राहू.”
मागील अनेक दिवसांपासून आम्ही कर्जमाफी आणि इतर शेतकरीविषयक मागण्यांसाठी सरकारकडे आंदोलन, निवेदन, मार्गदर्शक बैठका अशा सर्व मार्गांनी मागणी करत आलो. पण सरकारने मुद्दाम या मागण्यांकडे सपेशल कानाडोळा केला.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) October 28, 2025
आज महाराष्ट्रभरातून आलेले शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि… pic.twitter.com/cf03vNPklq
दोन ते तीन तास वाहतूक ठप्प
या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर सुमारे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प राहिली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वाहतूक हळूहळू सुरु केली असली तरी नागपूर शहरात आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राज्यातील शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याची चेतावणी प्रहार जनशक्ती पक्षाने दिली आहे.
