जेएनएन, नागपूर: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 37 हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज मागणी केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.एकीकडे शिक्षकांची पद रिक्त आहे दुसरीकडे राज्यात 55 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात. शिक्षण हा इतका महत्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची पद रिक्त आहे. सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक विद्यार्थी काय शिकणार? त्यामुळे सरकारने राज्यात शिक्षकांची किती पद रिक्त आहेत, आणि एका मर्यादित कालावधीत या जागा भराव्या अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात 15 हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली यावर वडेट्टीवर यांनी आक्षेप घेतला. राज्यात 37 हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत,अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे,सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गोरे यांनी मान्य केले चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची 472 जागा रिक्त आहेत. राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
हेही वाचा: TET Exam: TET मधील 2207 उमेदवारांचा निकाल रद्द; परीक्षा परिषदेची कठोर कारवाई, शिक्षक भरती प्रक्रियेत खळबळ
