जेएनएन, नागपूर. नागपूर महानगरपालिकेद्वारा श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरातील नागरिकांकरिता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून, शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून, हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे. नागपूर महानगरपालिकाद्वारा शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम जलाशय कुंडाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार, पोलिस लाईन टाकळी येथे 4 ते 6 फूट मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गोरेवाडा येथे 6 फूट व त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. लकडगंज येथील कच्छीविसा मैदान येथे 5 फूट पर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. तर गोरेवाडा व पोलिस लाईन टाकली येथे चार मोठ्या क्रेनची व्यवस्था असणार आहे. तसेच सर्वत्र विद्युत प्रकाश व्यवस्था असणार आहे. श्री गणेश भक्तांसाठी निर्माल्य कलश व इतर बाबींची गणेशभक्तांना माहिती प्रदान करण्याकरिता ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून फुटाळा आपली सेवा देत आहे. याशिवाय अशीच इतर स्वयंसेवी संस्थांद्वारे विविध ठिकाणीही सेवा दिली जात आहे.
तर नवव्या, दहाव्या आणि अकराव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोन येथे 20 ठिकाणी धरमपेठ झोन येथे 24 ठिकाणी, हनुमान नगर झोन येथे 36 ठिकाणी, धंतोली झोन येथे 19 ठिकाणी, नेहरुनगर झोन येथे 30 ठिकाणी गांधीबाग झोन येथे 28 ठिकाणी, सतरंजीपुरा झोन येथे 16 ठिकाणी, लकडगंज झोन 19 ठिकाणी, आशीनगर झोन येथे 12 ठिकाणी, मंगळवारी झोन येथे 11 ठिकाणी आणि कोराडी येथे 1 अशा 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर चिटणीस पार्कमध्ये 15 विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील 8 विसर्जन कुंड 20 फूट लांब व 12 फूट रुंद आहेत. 5 विसर्जन कुंज 15 फूट लांब व 9 फूट रुंद आहेत. तर 2 विसर्जन कुंड 12 फूट लांब व 8 फूट रुंद आहेत. या सर्व कुंडांना कुंडांना गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी, उल्हास, पेंच, भीमा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा अशा प्रमुख नद्यांची नावे देण्यात आली आहेत.
फोन करा अन् थेट वाहन आपल्या दारी ..
मनपाद्वारे नागरिकांना सोयीस्करपणे गणेशमूर्ती विसर्जन करता येणार आहे. याकरिता मनपाच्या दहाही झोन मध्ये झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. फिरते विसर्जन वाहन दारी बोलाविण्यासाठी नागरिकांना एक दिवसापूर्वी फोन करून गणेश मूर्ती विसर्जनाची तारीख, आपला संपूर्ण पत्ता, गुगल लोकेशन मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावयाची आहे.
हेही वाचा: Pune ganeshotsav 2025 : विसर्जन गणेश मूर्तीचे व्हिडिओ बनवाल तर होणार कारवाई, पुणे पोलिसांकडून आदेश जारी