जेएनएन, पुणे. Anant Chaturdashi: दहा दिवसांच्या आनंदसोहळ्यानंतर श्रीगणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेपासून पर्यावरणपूरक उपक्रमांपर्यंत सर्व आघाड्यांवर मनपाने काटेकोर नियोजन केले आहे.
विसर्जन घाटांवरील सुविधा
नदीकाठच्या घाटांवर दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, निर्माल्य कलश, लोखंडी टाक्या आणि कृत्रिम विसर्जन हौदांची सोय करण्यात आली आहे. ज्या भागात नदी, तलाव वा विहिरी नाहीत त्या ठिकाणी विसर्जनासाठी विशेष हौदे उभारण्यात आले आहेत. घाटांवर जीव रक्षक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक तैनात केले असून, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना, ध्वनीप्रणाली आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अग्निशमन दलाची तयारी
सन 1992 पासून सुरू असलेली परंपरा यंदाही कायम ठेवत अग्निशमन दलाने शहरातील 15 प्रमुख घाटांवर 24 तास बंदोबस्त ठेवला आहे. दररोज 90 जीवरक्षक व 15 फायरमन तैनात असणार आहेत. नदीपात्रात आडवा दोरखंड, लाईफ जॅकेट्स, ट्रॅफिक व्हेस्ट आदी सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी टिळक चौक व नटराज सिनेमा मागे बिनतारी संदेश केंद्र उभारण्यात येणार आहेत.
विद्युत विभागाचे नियोजन
429 विसर्जन घाटांवर 3,708 एलईडी दिवे, 197 जनरेटर, 388 स्पीकर सेट आणि 344 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पथदिवे व तात्पुरते दिवे रात्रभर कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांना अनधिकृत वीज जोडणी टाळून सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घ्यावी ही खजाबरदारी
नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये.
• पथदिवे खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये.
• पथदिवे खांबातून विनापरवाना वीज घेऊ नये.
• जनावरे पथदिवे खांबांना बांधू नयेत.
• जंक्शन बॉक्स वर पाय ठेवून खांबावर चढू नये.
• कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधू नयेत.
• बांधकामांमध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नयेत. खांबांना फ्लेक्स, होर्डिंग बांधू नये.
• कोणत्याही प्रकारची केबल तार पथदिवे खांबावरून ओढू नये.
• विविध खोदाईमुळे जमिनीवर उघड्यावर आलेल्या भूमिगत केबल्सजवळ जाऊ नये, अथवा त्यांना स्पर्श करू नये.
रस्त्यांची देखभाल
पथ विभागाने ‘मिशन 32’ अंतर्गत प्रमुख रस्त्यांची रिसरफेसिंग व दुरुस्ती पूर्ण केली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर विशेष पॅचवर्क, डांबरीकरण व ड्रेनेज चेंबर दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. ‘PMC रोड मित्र’ अॅपद्वारे नागरिकांना खड्ड्यांबाबत तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मोटार वाहन विभागाची मदत
निर्माल्य संकलनासाठी 108 कंटेनर, मूर्ती वाहतुकीसाठी 760 वाहने, वाघोली खाणीतील पुनर्विसर्जनासाठी JCB, पोकलेन तसेच टेम्पो ट्रॅव्हलरची सोय करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम
शहरात 38 कृत्रिम हौदे, 648 लोखंडी टाक्या, 328 निर्माल्य कलश आणि 241 मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शाडू मातीच्या पुनर्वापरासाठी 46 संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मागील वर्षी (2024) 5.60 लाखांहून अधिक मूर्ती कृत्रिम हौदे व लोखंडी टाक्यांत विसर्जित झाल्या होत्या; यावर्षीही नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
आरोग्य विभाग सज्ज
लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने 30 रुग्णवाहिका, 80 डॉक्टर, 200 कर्मचारी व 15 वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. विसर्जन मार्गावर ICU सुविधा असलेले आरोग्य कक्ष तयार केले असून, कमला नेहरू रुग्णालयात 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे आवाहन :
प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो पुणेकरांनी नदी किंवा जलस्त्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे यासाठी व्यवस्थाही केली जाते. या दृष्टीने महापालिकेने शहरात विसर्जनासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 38 कृत्रिम हौद, एकूण 281ठिकाणी ठेवलेल्या 648 लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे तसेच 338 ठिकाणी निर्माल्य कलश- कंटेनर ठेवण्यात आले आहेत. मूतीं संकलनासाठी शहराच्या विविध भागांत 241 मूर्तिदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिवसभरात शहरात 1 लाख 32 हजार 728 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत सात दिवसांमध्येv1 लाख 85 हजार 530 गणेशमूर्तीचे विसर्जन झाले आहे.
हेही वाचा: Anant Chaturthi 2025 wishes: अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणरायाला निरोप, या शुभेच्छा संदेशासह द्या अनंत चतुर्दशी शुभेच्छा
हेही वाचा: Anant Chaturdashi 2025: बाप्पाला निरोप देण्यापूर्वी करू नका या चुका, अन्यथा रागावतील गणपती महाराज