जेएनएन, मुंबई. वरळी येथील NSCI डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरुवातीला मद्याच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा असली, तरी वैद्यकीय अहवालात मृत तरुणाच्या शरीरात मद्याचा कोणताही अंश आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा मृत्यू आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या कोंदट वातावरणाचा आणि त्यातून आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याचा परिणाम असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाची ओळख रूशील गांगुर्डे अशी झाली आहे. कॉन्सर्टदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमस्थळी उष्णता, घुसमट आणि श्वास घेण्यास होणारा त्रास याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होते. मात्र, गर्दी नियंत्रण, पुरेशी हवा खेळती राहण्यासाठीची व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होते काय, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रूशील याला कार्यक्रमादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या चर्चांमध्ये मद्यसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात होते. परंतु वैद्यकीय तपासणीत शरीरात मद्याचे अंश नसल्याचे आढळले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अत्यंत गर्दी, वाढलेले तापमान, अपुरी हवा आणि शारीरिक ताण यांमुळे काही व्यक्तींना हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर शारीरिक त्रास होऊ शकतो. बंदिस्त ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये गर्दीचे नियोजन आणि वायुवीजनाची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर रूशीलच्या मृत्यूमागे कोंदट वातावरण हे एक प्रमुख कारण असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप जाहीर झालेला नाही. संबंधित तपास यंत्रणा कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेल्या सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, वैद्यकीय सुविधा तसेच कार्यक्रमासाठी दिलेल्या परवानग्यांची तपासणी करत करण्यात येत आहे.पोलिसानी आयोजकांकडूनही या घटनेबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावरील मनोरंजन कार्यक्रमांच्या सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थितांची संख्या, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, वैद्यकीय पथके, अग्निसुरक्षा आणि वायुवीजन याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
रूशीलच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली असून, घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तपासाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असले, तरी या घटनेने मोठ्या कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे.
