मुंबई. Mumbai Local Train : बॉलीवूड चित्रपट थ्री इडिएट या चित्रपटात व्हिडिओ कॉल करून डॉक्टरकडून टिप्स घेऊन प्रसूती केल्याचे दाखवले आहे. तसाच चित्रपटाला शोभणारा प्रसंग मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती महिला वेदनेने प्रचंड विव्हळू लागली. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

या स्टेशनवर वैद्यकीय सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने कोणीतीही मेडिकल पार्श्वभूमी नसताना महिलेची सुखरुप प्रसूती केली. विकास बेद्रे या तरुणाने डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलेची प्रसूती केली. रोहित पवारांनी याबाबतची माहिती त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत तरूणाचं कौतुक केलं आहे.

रोहित पवारांच्या ट्विटमध्ये काय आहे -

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन!

मध्यरात्रीच्या सुमारास बाका प्रसंग -

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 12.40 च्या सुमारास ही घटना घडली. एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत असताना तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. महिला मदतीसाठी ओरडू लागली मात्र रात्रीच्या वेळी कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. त्यावेळी रेल्वेच्या त्याच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची आपतकालीन चेन ओढली व  लोकल राम मंदिर रेल्वे स्थानकावर थांबवली. त्यानंतर आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून घटनेचे गांभीर्य सांगितले. विशेष म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेही डॉक्टर देशमुख यांनी फोन रिसीव्ह करून मोलाचे मार्गदर्शन केले व एका महिलेचे प्राण वाचवले, याबद्दल विकास बेद्रे सोबत महिला डॉक्टरचेही कौतुक केले जात आहे.