एजन्सी, ठाणे: ठाणे परिसरातील एका तरुणासोबत एका मुलीचे संबंध होते. या संबंधांवरून झालेल्या वादातून एका महिलेने आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या केली आहे. याप्रकरणी, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात एका महिलेला सोमवारी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

ही घटना पहाटेच्या सुमारास भैय्यासाहेब आंबेडकर नगर, उल्हासनगर येथील कुटुंबीयांच्या निवासस्थानी घडली, अशी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली.

पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास, आशा दत्ता गरड (40) यांनी आपली मुलगी अमृता गरड हिला एका स्थानिक तरुणासोबतच्या तिच्या प्रेमसंबंधांबद्दल जाब विचारला. तिने अमृताला त्याच्याशी सर्व संबंध तोडण्यास सांगितले, पण त्या किशोरवयीन मुलीने नकार दिला. "रागाच्या भरात आशाने अमृताचा तिच्याच स्कार्फने गळा दाबला," असे पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून आणि इतर गुन्ह्यांसाठी आशा गरड यांना अटक करण्यात आली, असे आव्हाड यांनी सांगितले.