जेएनएन, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशी अहवालातील विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सरकारवर माहिती लपवण्याचा आरोप केला. “अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात असू शकतो, अशी शंका जनतेमध्ये आणि आमदार रोहित पवार यांनी सातत्याने व्यक्त केली आहे. मात्र अद्यापही तपासाबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.”
अहवालाचा विलंब संशयास्पद?
माने यांनी सांगितले की, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अपघाताचा प्राथमिक अहवाल एका महिन्यात सादर केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र महिनाभर उलटूनही अहवाल जाहीर झालेला नाही.
तसेच देशातील विमान अपघातांची चौकशी करणाऱ्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडूनही अधिकृत अहवाल समोर आलेला नसल्याने संशय अधिक गडद होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारवर थेट प्रश्न!
- शरद पवार गटाने सरकारसमोर काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत —
- अपघाताबाबत एफआयआर का नोंदवला गेला नाही?
- तपासाची प्रगती सार्वजनिक का केली जात नाही?
- चौकशी अहवाल जाहीर करण्यात विलंब का होत आहे?
- सरकार नेमकं काय लपवत आहे?
माने यांनी सांगितले की, “हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर राज्याच्या सुरक्षेशी आणि पारदर्शकतेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. सत्य बाहेर यावे ही जनतेची अपेक्षा आहे.”
पारदर्शक चौकशीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. अपघातामागील नेमके कारण, तांत्रिक बिघाड की घातपात, याबाबत अधिकृत भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली.
