मुंबई - Mumbai local train : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकल सेवा ठप्प होणे. विशेषतः मुसळधार पावसात दादर, माटुंगा रोड, माहीम आणि वसई परिसरात रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत या भागांतील रेल्वे मार्ग जलमय झाले होते, ज्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने रूळ उंचावण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला काही आठवड्यांपूर्वीच सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे 60 मिमीपर्यंत रूळ उंचावले गेले आहेत. लवकरच हे काम 120 ते 150 मिमीपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पावसाळ्यातील अडथळ्यावर उपाय -
दादर, माटुंगा रोड आणि माहिम ही स्थानके पावसाळ्यात जलमय केंद्र बनतात. निचरा यंत्रणा सक्षम असूनही मुसळधार पावसात रेल्वे ट्रॅकवर पाणी चढते. त्यामुळे लोकल सेवा 10 ते 15 किमी वेगानेच धावतात, अनेक वेळा सेवा थांबवावी लागते. या नव्या उंचीकरणामुळे पुढील पावसाळ्यात अशा अडचणी टाळता येणार आहे असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
नियोजन आणि कामाचा गती!
उंचावले जाणारे रूळ: दादर–माटुंगा रोड–माहीम–वसई आहेत. एकूण 120 ते 150 मिमी उंची वाढवली जात आहे.
कामाचा वेग! टप्प्याटप्प्याने, रात्रीच्या वेळेत लोकल वाहतुकीला अडथळा न आणता काम सुरू आहे.
अंदाजे पूर्णता: पुढील काही महिन्यांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे
तांत्रिक सुधारणा!
रूळ उंचावण्याबरोबरच रेल्वेने ट्रॅकखालील ड्रेनेज सिस्टम सुधारणे, बॅलास्ट लेयर बदलणे आणि सिग्नलिंग केबल्स उंचावर नेणे यावरही भर दिला आहे. यामुळे मुसळधार पावसात पाणी साचणार नाही आणि विद्युत प्रणालीलाही हानी होणार नाही.
प्रवाशांचा दिलासा!
दरवर्षी पावसाळ्यात “ट्रेन उशीराने येणार का? हा मुंबईकरांचा नेहमीचा प्रश्न असतो. मात्र, या नव्या कामांमुळे प्रवाशांना पुढील पावसाळ्यात लोकल खोळंब्याचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
