जेएनएन, मुंबई. Mumbai Rains : चार दिवसांची उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. मुंबई शहर व उपनगरात रविवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून दृश्यमानता देखील कमी झाली आहे. गणपतीच्या आगमनाआधीच मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी अनेक ठिकाणी कडक ऊन पडले होते मात्र आज (सोमवार) सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई, उपनगर, कोकणसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक  भागात जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे.

मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांना तयारी करण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात परतत असून पावसामुळे त्यांनाही अडचण येत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

हवामान विभागाचा इशारा -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्हात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात अलर्ट-

    मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.तर काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

    मुंबईत पावसाचा अलर्ट -

    आज पहाटेपासून मुंबईत सतत पाऊस सुरू असून, अनेक सखल भागांत पाणी साचू लागले आहे. लोकल रेल्वे वाहतूक काही ठिकाणी मंदावली असली तरी सध्या सेवा सुरू आहे. रस्त्यांवरील वाहतूक मात्र संथ गतीने सुरू आहे.