जेएनएन, पुणे/मुंबई: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आता उन्हाचा तडाखा वाढू लागला असून तापमानाने चाळीशी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुखद वाटणारे हवामान आता अचानक बदलले असून उष्णतेची लाट (Heatwave) तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात कुठे किती तापमान? 

राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेचा कहर अधिक जाणवत असून अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या भागांमध्ये तापमान 42 ते 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.  

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून पुढील काही दिवसांत आणखी वाढ होणार आहे.  

कोकण किनारपट्टीत मात्र उष्णता आणि आर्द्रतेचा दुहेरी फटका बसणार असून मुंबईसह परिसरात उकाडा वाढणार आहे.  

देशभरातही उष्णतेचा तडाखा

    महाराष्ट्रासोबत गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. काही ठिकाणी 42 अंशांपर्यंत नोंद झाली असून पुढील आठवड्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.   

    दुपारी 12 नंतर सावध राहा!

    हवामान विभागाने दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण याच वेळेत सूर्याची किरणे तीव्र असतात आणि हीटस्ट्रोकचा धोका वाढतो.

    हिटवेवची कारण काय?

    राज्यावर अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे आकाश स्वच्छ असून सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत आहे. त्यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे.   

    नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना!

    • दुपारी बाहेर जाणे टाळा
    • भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या
    • डोक्यावर टोपी/स्कार्फ वापरा
    • हलके, सुती कपडे परिधान करा
    • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केले आहे.

    IMD च्या अंदाजानुसार पुढील 3 ते 5 दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. काही भागांमध्ये तापमान 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.