एजन्सी, ठाणे: ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका पुलावर व्हॅन सिमेंट मिक्सरला धडकल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुरबाडच्या गोविली गावातील रायता पुलावर सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला व्हॅनची धडक बसली, असे त्याने सांगितले. या अपघातात व्हॅनमधल्या किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत, असे त्यांनी सांगितले. कल्याणहून मुरबाडकडे जाणाऱ्या व्हॅनची समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला समोरासमोर धडक बसली, असे त्यांनी सांगितले
जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
बचाव आणि वैद्यकीय पथकांसह स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत, असे त्यांनी सांगितले.
मृतकांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश
पीडितांपैकी सहा जणांची ओळख पटली असून, इतरांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मृतकांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता, असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली टॅक्सी मुरबाडच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट मिक्सरशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की टॅक्सीचा चुराडा झाला. धडकेनंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहनावरील नियंत्रण सुटले
प्राथमिक अंदाजानुसार, सिमेंट मिक्सरचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.
