नवी मुंबई. नवी मुंबईतील विविध भागांचा पाणीपुरवठा आज,तब्बल 16 तास बंद राहणार आहे. मोरवे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विविध महत्त्वाची कामे करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आठ विभागांसह सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवारी पहाटे 2 वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत जलवाहिनी तसेच जलशुद्धीकरण केंद्राशी संबंधित आवश्यक तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.
कोणत्या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार?
या पाणीपुरवठा बंदचा फटका नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांना बसणार आहे. याशिवाय सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमध्येही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा
मुख्य जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण केंद्रातील कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, जलवाहिनीतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.
त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद असलेल्या भागांतील नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करणे गरजेचे आहे. तसेच बुधवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
16 तासांचा पाणीपुरवठा बंद
मोरवे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कामांमुळे मंगळवारी सकाळी 10 ते बुधवारी पहाटे 2 या 16 तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामांमुळे भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील नागरिकांनी पाणीपुरवठा बंदचा कालावधी लक्षात घेऊन पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकाने केले आहे.
