जेएनएन, मुंबई. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
काल संध्याकाळच्या सुमारास आशा भोसले यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला होता. छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे उपचारादरम्यान आज (12 एप्रिल ) निधन झाले आहे.
आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद - फडणवीस
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
Nagpur, Maharashtra: On the demise of Singer and Padma Vibhushan awardee Asha Bhosle, Chief Minister Devendra Fadnavis says, "This is a very sad moment for the whole of India and for music lovers around the world. Asha Bhosle, known as one of the most versatile artists, has… pic.twitter.com/awdcjUqW8P
— IANS (@ians_india) April 12, 2026
ही कल्पनाच करवत नाही
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
