जेएनएन, मुंबई. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
उद्या शिवाजी पार्कात होणार अंतिम संस्कार
आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या सकाळी अकरा शिवाजी पार्क येथे शासकीय इतमात अंत्यसंकार केला जाणार आहे.त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संपूर्ण संगीतविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल संध्याकाळच्या सुमारास आशा भोसले यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला होता. छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे उपचारादरम्यान आज (12 एप्रिल ) निधन झाले आहे.
आशा भोसले यांच्या कारकिर्दीचा सुवर्णप्रवास!
आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गाऊन श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी सादर केली.
त्यांनी आर . डी . बर्मन यांच्यासोबत दिलेली गाणी आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी अजरामर गाणी त्यांच्या आवाजामुळे अमर झाली.
आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. भारत सरकारने त्यांना ‘पद्म विभूषण’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलं.
संगीतविश्वाची प्रतिक्रिया
त्यांच्या निधनानंतर विविध कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. “त्यांचा आवाज कायम अमर राहील,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
आशा भोसले यांच्या चाहत्यांमध्ये शोक
आशा भोसले यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांचा आवाज सदैव रसिकांच्या मनात जिवंत राहील.
