जेएनएन, मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी (VBA) ने राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या बंदची घोषणा करत राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या घोषणेनंतर राज्यभरात बंदच्या परिणामांबाबत चर्चा सुरू झाली असून, विशेषतः मुंबईत नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बंद का पुकारण्यात आला?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे समाज सेवक सोनम वांगचूक,विद्यार्थी संघटना कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. 

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या

  • NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी.
  • परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि व्यापक सुधारणा.
  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
  • पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी.

बंदला कोणाचा पाठिंबा?

वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. भाजपविरोधी पक्षांनीही या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. विविध जिल्ह्यांत मोर्चे, निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.