नवी दिल्ली/ मुंबई. sharad pawar meets pm modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट अशा वेळी घेतली आहे, जेव्हा देशात NEET-UG पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलने, पावसाळी अधिवेशन आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.
पवार-मोदी भेटीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएत सामील होणार का? याच्या चर्चा रंगल्या असतानाच शरद पवारांनी ट्विट करत आपल्या पंतप्रधान मोदींच्या भेटीमागील हेतू स्पष्ट केला आहे.
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी,… pic.twitter.com/zA0ms6aMEO
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 22, 2026
शरद पवारांनी म्हटले आहे की, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
पवारांनी पुढे म्हटले आहे की, बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय पंतप्रधानांनी दिले. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलन स्थळी भेट दिली होती. तिथे त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आणि पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला होता. त्याच वेळी, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीलाही पाठिंबा दर्शवला होता. या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठया चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडल्याचेही वृत्त आहे. त्यातच आज मोदी-पवार भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
