मुंबई | Uddhav Thackeray-Raj Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी पुन्हा एकदा वज्रमूठ बांधली आहे. काल समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे व राज ठाकरेही निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत.
काल विरोधी पक्षांनी आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते, मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे.
दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ प्रमुख मुद्दे!
विरोधकांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत दुबार नावं असलेली मतदार यादी, कालबाह्य नावे हटविण्यात आलेली नाहीत, तसेच नवीन मतदारांची नोंदणी अपूर्ण असल्याच्या तक्रारी करण्यात आले आहेत. या अनियमिततेमुळे निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होऊ शकणार नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे. महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी कालच्या बैठकीत आयोगाला स्पष्टपणे सांगितलं की"मतदार याद्यांतील घोळ निस्तरल्या शिवाय निवडणुका घेऊ नयेत. अन्यथा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार एकाच व्यासपीठावर!
आजच्या शिष्टमंडळात राज्यातील मावियाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, आणि प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
संयुक्त पत्रकार परिषद ठरली -
या चर्चेनंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या परिषदेतून विरोधकांची आगामी निवडणुकांबाबतची संयुक्त भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील घोळ, आयोगाच्या भूमिकेवर नाराजी आणि पारदर्शक निवडणुकीची मागणी पुन्हा मांडली जाणार आहे.