मुंबई - Raj Thackeray on BJP: महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईची निवडणूक हायव्होलटेज झाली आहे. अभी नहीं तो कभी नहीं. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय. मराठी माणसानेही एक व्हायला हवे, असे ठाकरे बंधूंनी या मुलाखतीत म्हटले. राजकारणातील लोक इकडे तिकडे जातात, पण पक्ष संपविणे, त्याचे चिन्ह काढून घेणे हे मराठी माणसाविरुद्धच षडयंत्र आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज यानी अशा लोकांना ससाण्याची उपमा देत जोरदार टोलेबाजी केली. या लोकांचे काही स्वकतृत्व नसते. मालकाच्या हातावर बसून ससाणा सावज मारतो. तसेच यांचे सुरु आहे, पक्ष तोडले जात आहेत. दिल्लीतील मालकाच्या हातावर बसून आपल्याच माणसांची शिकार करणारे हे ससाणे आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधु विरुद्ध भाजप-शिंदेसेना असा दुहेरी सामना होत आहे. त्यापूर्वीच ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत समोर आल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुंबई तोडण्यापासून ते अदानी आणि भाजप-शिंदे सेनेपर्यंत सर्वच मुद्यांवर दणदणीत, खणखणीत आणि जळजळीत भाष्य दोघांनी केले. यावेळी भाजपवर राज ठाकरे कडाडले.
संजय राउत व महेश मांजरेकर यांनी उद्धव व राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी त्यांनी प्रश्न विचारला की, दोन्ही बंधु एकत्र आल्याने महाराष्ट्राला आनंद झाला. मराठी माणूस एकवटला. पण भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या युतीविषयी म्हणतात की ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. म्हणजे राज ठाकरे हे कन्फ्युज आहेत, आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी करप्शनचा आरोप केला. आपण कन्फ्युज आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांच्या या प्रश्नावर राज ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं. राज म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा डोलारा हा फक्त नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही त्यांनीच बसवलेली माणसं आहेत सगळी. यातला बसवलेला माणूस कोणीच नाही. बसलेला म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचं ऐकतो, मालकाचं ऐकतो. मालक जे सांगेल, त्याप्रमाणं काम करायचं. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटतं नाही, असे लोक मालकाच्या हातावर बसलेले ससाणे आहेत, फक्त सावज टिपायचं त्यांचं काम.
ते 2000 कोटी कुठून आले- राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले की, फडणवीसांनी भ्रष्टाचाऱ्याच्या गोष्टी करू नयेत. ते अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी भरून पुरावे आणणार होते. आता म्हणतायत कोर्टात केस सुरु आहे. तुमच्याकडे आहेत तर द्या ना पुरावे. पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही. जर तसे असेल तर पन्नास कोटी 40 आमदारांना दिल्यास 2000 कोटी होतात, हे एवढे पैसे कुठून आले, असाही सवाल राज ठाकरे यांनी केला.
