मुंबई l बीएमसीची निवडणुक सुरू असतानाच मनसेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे.मनसेचे मुंबईतील आक्रमक आणि चर्चेत असलेले नेते संदीप देशपांडे लवकरच मनसेला रामराम ठोकणार आहे असा दावा भाजपात नुकतेच प्रवेश केलेले माजी मनसे नेते संतोष धुरी यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे मनसेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संतोष धुरींचा मोठा दावा-
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष धुरी म्हणाले की,“मनपा निवडणुका झाल्यानंतर संदीप देशपांडे मनसे सोडण्याचा निर्णय घेतील. पक्षात अंतर्गत नाराजी आहे. अनेक नेते अस्वस्थ आहेत.”या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, मनसेत आणखी मोठे धक्के बसणार
आज संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद-
या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत ते संतोष धुरींच्या दाव्यांवर उत्तर देणार का, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर पूर्णविराम देणार की नव्या राजकीय वाटचालीचे संकेत देणार, याबाबत उत्सुकता आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या संदीप देशपांडे यांच्या भूमिकेकडे केवळ मनसेच नव्हे तर भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष आहे. देशपांडे यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला, तर मुंबईतील महानगर पालिका निवडणूक दरम्यान मनसेत मोठा भूकंप मानला जाईल.
मनसेसाठी धोक्याची घंटा?
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे संघटन मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना, अशा चर्चा पक्षासाठी अडचणीच्या ठरू शकतात. आधीच काही नेत्यांनी भाजपची वाट धरल्यानंतर आता संदीप देशपांडे यांच्याबाबतच्या चर्चांमुळे मनसेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
