जेएनएन, बदलापूर. Maharashtra Political News: राज्यात एकीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजप यांच्यात तीव्र वैचारिक आणि राजकीय संघर्ष सुरू असताना बदलापूरमध्ये मात्र याचे अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अनपेक्षितरीत्या हातमिळवणी केली आहे. 

उद्धव ठाकरे गटाच्या सात उमेदवारांनी स्वतःच्या गटातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता थेट भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीतील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. उबाठा-भाजप या नव्या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार परिषदेत घोषणा!

पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार कविता सकट, प्रफुल्ल कांबळे, वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, सुरेश शिंदे, सुभाष शिंदे आणि रुपेश साळवी हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या गटाच्या नगराध्यक्ष उमेदवार प्रिया गवळी यांना पाठिंबा न देता भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना समर्थन असल्याचे जाहीर केले.

या भूमिकेमुळे ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

    विकासासाठी हातमिळवणीचा दावा!

    या सातही उमेदवारांनी ‘विकासासाठी हातमिळवणी’ केल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये वरच्या स्तरावर संघर्ष असला तरी स्थानिक स्तरावर एकत्र काम केल्यास शहराचा विकास वेगाने होईल असा दावा केला आहे.

    मात्र ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वाला या भूमिकेमुळे धक्का बसला असून पुढील काही दिवसात अंतर्गत मतभेद आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    हेही वाचा - BMC Election 2025: मुंबई-ठाणे पालिका निवडणुकीत युतीत जागावाटपावरून रस्सीखेच, शिंदेंचा 120 जागांवर दावा?

    निवडणूक रंगतदार!

    बदलापूरातील नगराध्यक्ष पदाची लढत आता अधिक रंगतदार बनली आहे. अनपेक्षित राजकीय मैत्रीचा निवडणुकीवर किती परिणाम होईल, हे येणारा काळच सांगेल. 

    2 डिसेंबर रोजी मतदान 

    2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाला काही तास शिल्लक असताना सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात प्रचंड जोर लावला आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका आणि प्रचारयुद्ध यामुळे वातावरण तापले आहे.