जेएनएन, मुंबई. राज्यातील 246 नगरपालिका 42 नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना 20 नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल 22 नोव्हेंबरला आला होता. मग 30 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 8 दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास 10 वर्षानंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करण्यात आले. दुबार, तिबार नावे मतदार यादीत दाखवली, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्देश दिल्याने अनेक नगरपंचायतीमधील भवितव्य टांगणीला लागले आहे आणि आता तर 20 नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
3 तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे 3 तारखेचा निकालही 20 तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? निवडणुका या निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे. पण निवडणूक आयोगाचा मागील काही वर्षांतील कारभार पाहता आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाहीत, हे खेदाने म्हणावे लागते अशी टीका काँग्रेसने केली आहे .
सोनिया व राहुलवर राजकीय सुडबुद्धीने गुन्हा…
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार राजकीय सुडबुद्धीतून केलेला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह हे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेता गैरवापर करत आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण निराधार व कपोल कल्पित आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करणारे मोदी शाह यांचे सरकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे का दाखल करत नाही, असा सवालही सपकाळ यांनी केला आहे.
