जेएनएन, मुंबई. शिवसेनेकडून राबविण्यात आलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ला यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटातील सहा खासदारांची अधिकृत राजकीय भूमिका आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता उर्वरित चार खासदारांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे संमतीपत्र ओम बिरला यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील कागदपत्रे, तसेच संबंधित खासदारांचे एकत्रित छायाचित्र आणि व्हिडीओ पुरावे आज सार्वजनिक केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, हे खासदार आगामी काळात शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या संभाव्य पत्रकार परिषदेकडे लागले आहे. 

दरम्यान, या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना, खासदारांच्या संभाव्य भूमिकाबदलामुळे राष्ट्रीय स्तरावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

शिवसेना आणि ठाकरे गटातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत असून, आमदारांनंतर खासदारांच्या पातळीवरही मोठी राजकीय पुनर्रचना होत असल्याचे चित्र दिसत आहे. आज जाहीर होणारी भूमिका आणि त्यासोबत सादर करण्यात येणारे दस्तऐवज यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

    उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे (Shivsena UBT 9 MP Name)

    • अरविंद सावंत
    • अनिल देसाई
    • राजाभाऊ वाजे
    • संजय दिना पाटील
    • संजय जाधव
    • संजय देशमुख
    • नागेश पाटील आष्टीकर
    • ओमराजे निंबाळकर
    • भाऊसाहेब वाकचौरे

     भूमिका जाहीर - शिंदे सेनेत जाणार

    • नागेश आष्टीकर
    • ओमराजे निंबाळकर

    यांची भूमिका जाहीर होण्याची शक्यता

    • संजय दिना पाटील
    • संजय जाधव
    • संजय देशमुख
    • भाऊसाहेब वाकचौरे

    हेही वाचा - Operation Tiger: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठरलं! ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार