मुंबई. Uddhav Thackeray meet Raj Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

माहितीनुसार, आगामी निवडणुकांसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः वचननामा, प्रचाराची दिशा, प्रचारसभा, तसेच काही प्रभागांमधील रणनिती यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती जाहीर केल्यानंतर ही पहिलीच महत्त्वाची प्रत्यक्ष भेट असल्याने राजकीय महत्त्व मोठे मानले जात आहे.

शिवतीर्थ परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिसरात उपस्थित आहेत. ठाकरे बंधूंच्या या भेटीनंतर प्रचाराची पुढील रूपरेषा स्पष्ट होण्याची शक्यता असून, संयुक्त प्रचाराचा कार्यक्रमही अंतिम केला जाऊ शकतो.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठा संदेश जाणार असल्याचं बोललं जात आहे. या भेटीतून महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही महत्त्वाचा राजकीय संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.