जेएनएन, मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अॅक्शन मोडवर आले आहे.उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाढत चाललेली बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असताना, ती रोखण्यासाठी मुख्यमंत्री थेट मैदानात उतरल्याचं चित्र आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह प्रमुख शहरांमधील बंडखोर उमेदवारांशी मुख्यमंत्री फडणवीस थेट संपर्क साधत आहेत. अनेक अपक्ष उमेदवारांशी फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद साधत, निवडणुकीत माघार घेण्याबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या पण उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या नेत्यांना निवडणुकीनंतर राजकीय पुनर्वसनाचा शब्द देत बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माहितीनुसार, काही बंडखोरांना थेट मुख्यमंत्र्यांकडून समज दिली जात असताना, काही ठिकाणी ही जबाबदारी स्थानिक आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. “पक्षाला अडचणीत आणणारी बंडखोरी कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही,” असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांकडून दिला जात असल्याचंही समजते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या शहरांवर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष आहे. या दोन्ही ठिकाणी बंडखोरीचा फटका महायुतीला बसू शकतो, याची जाणीव असल्याने फडणवीस स्वतः या शहरांतील राजकीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. येत्या काही तासांत या भागांमध्ये बंडखोर माघार घेतात की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे अंतर्गत बंडखोरी आवरण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरल्याने, महायुतीची ताकद एकसंध ठेवण्याचा हा निर्णायक प्रयत्न मानला जात आहे. आगामी निवडणुकीच्या निकालांवर या ‘बंडखोरी शमन मोहिमे’चा किती परिणाम होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा: पिंपरी-चिंचवड मनपासाठी नवं समीकरण? राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार? – अजित पवारांचे संकेत
