जेएनएन, ठाणे: मुंबईप्रमाणेच आता ठाणे महापालिकेतही महायुतीमध्ये सत्तेचा तिढा निर्माण झाल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिकेतील महापौरपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.युतीत असूनही ठाण्यात सत्तास्थापनेबाबत अनिश्चितता कायम आहे.
माहितीनुसार, ठाणे महापालिकेत पक्ष म्हणून शिवसेनेकडे एकट्याच बहुमत आहे. त्यामुळे आगामी पाचही वर्ष महापौरपद शिवसेनेकडेच राहायला हवं, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, संख्याबळाच्या जोरावर महापौरपदावर दावा करणं हा आमचा लोकशाही हक्क आहे आणि त्यात तडजोड केली जाणार नाही.
भाजपची अडीच वर्षांची मागणी
दुसरीकडे भाजपकडून मात्र महापौरपदासाठी वेगळीच भूमिका मांडण्यात येत आहे. भाजपची मागणी आहे की, पाच वर्षांच्या कालावधीत किमान अडीच वर्ष महापौरपद भाजपला मिळावं. भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की, महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात आली असून, त्यामुळे सत्तेत समान वाटा मिळणं अपेक्षित आहे.
सत्ता न मिळाल्यास भाजप विरोधी बाकावर?
महायुतीत मतभेदांमुळेच “भाजप ठाणे महापालिकेत विरोधी बाकावर बसणार का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर महापौरपदाबाबत तोडगा निघाला नाही, तर भाजप स्वतंत्र भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाण्यात महायुतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत.
वरिष्ठ पातळीवर हालचाली
ठाणे मनपातील हा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.
ठाण्याच्या राजकारणाकडे लक्ष
मुंबईनंतर ठाणे ही राज्यातील महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची महापालिका मानली जाते. त्यामुळे ठाण्यात सत्तास्थापना कशी होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसांत या वादावर तोडगा निघतो की भाजप विरोधी बाकावर बसते, हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: ZP Elections: आजपासून झेडपी–पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्री प्रचार मैदानात
हेही वाचा: BMC Mayor: मुंबई महापौरपदाबाबत भाजप–शिवसेनेत एकमत; झेडपी निवडणूक प्रचारानंतरच महापौर निवड प्रक्रिया
