जेएनएन, मुंबई: मुंबई महापौरपदाच्या निवडीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात अखेर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामुळे मुंबई महापौरपदाचा निर्णय तात्पुरता पुढे ढकलण्यात आला असून, “आधी झेडपी प्रचार, नंतर महापौरपद” या सूत्रावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचं कळतं.

माहितीनुसार, राज्यभरात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त असल्यामुळे मुंबई महापौरपदाची प्रक्रिया उशिरा सुरू होणार आहे. या प्रचार मोहिमा आटोपल्यानंतरच भाजप–शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

5 फेब्रुवारीनंतरच महापौर निवडीचा मार्ग मोकळा?
माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारीनंतरच मुंबई महापौर निवडीची अधिकृत हालचाल सुरू होईल. त्यानंतर युतीतील समन्वय समिती किंवा वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौरपदाबाबतचा अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईकडे लक्ष, पण प्राधान्य झेडपी प्रचाराला
मुंबई महापौरपद हे राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळे या पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटप, उमेदवाराची निवड आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे. मात्र, सध्या दोन्ही प्रमुख नेते जिल्हा परिषद निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करत असल्याने मुंबईचा विषय तात्पुरता बाजूला ठेवण्यात आला आहे.

युतीत समन्वय, पण उत्सुकता कायम
भाजप–शिवसेनेत महापौरपदाबाबत एकमत झाल्याचं सांगितलं जात असलं, तरी प्रत्यक्षात महापौर कोणाचा? सूत्र काय? हे चित्र झेडपी निवडणूक प्रचारानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असून, येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Baramati Plane Crash: मोठी दुर्घटना! बारामतीत अजित पवारांचे विमान कोसळले